Monday, March 29, 2010

रस्त्यांचे शिल्पकार

    उडत उडत कानावर बातमी आलेली होतीच म्हणे कर्वे नगरच्या सगळ्या गल्ल्यांचे काही दिवसात डांबरीकरण होणार... आणि चक्क या कामाला सुरुवातही झाली हो!
  आणि पहिली प्रतिक्रिया मनात आली ती आता चार-एक दिवस तरी आवाजाची कटकट सहन करावी लागणार. (कसं आहे एव्हाना खराब रस्त्यांची चांगली सवय झालेली आहे. त्यातून आम्ही मराठवाड्यातले आणि त्यातून उस्मानाबादचे त्यामुळे लहानपणापासूनच "असे रस्ते प्यार आम्हाला..." असो...)
  आणि कालपासून कामाला सुरुवात झाली... आवाजाचा त्रास होत होता... काय चाललाय बघावं म्हणून  बाहेर गेले... आणि खरं सांगू... खिळून राहिले ते काम बघत...
  एखादा कलाकाराची नवनिर्मिती बघताना जो आनंद होत असतो तोच मी माझ्या अंतर्मनातून अनुभवत होते...
 रणरणत्या उन्हात ही मंडळी काम करत होती (मनात परिस्थितीला शिव्या घालत असतीलही ).
एक ट्रक भरून खडी "पावर पेवर मशीन",मध्ये टाकायचे. एक माणूस झारीमध्ये "टार" ओतून तो रोडवर एखाद्या चित्रकाराप्रमाणे रस्त्याच्या कागदावर जणू  रेघोट्या मारत होता...
 त्यावरून ती
"पावर पेवर मशीन" सफाईने खडी ओतत येत होती आणि सोबतच त्यावरून रोलर फिरल्याने तो ढीग सपाट होत येत होता... सोबतचे गुणी जन कुठे जास्तीची पडलेली खडी काढून टाकत होते... कुठे चुकून खड्डा... खोचा राहिलेल्या असतील तर तेथे खडी अत्यंत सफाईने पसरत होते...
 अत्यंत सुंदरपणे हा कार्यक्रम पार पडत होता आणि रस्त्याचं रूपही पालटत होतं.
 आता शेवटचा हात.... "रोड रोलर" त्या पूर्ण रस्त्यावरून फिरत होता...आणि बघता बघता रस्त्याचं स्वरूप पालटत होतं.

 बघता बघता त्या रस्ताने जुनी लक्तरे फेकून देऊन नवी काळी पैठणी नेसून घेतली होती.
एका नवीनच एकरूपतेचं दर्शन मला घडत होतं... वाटलं असं कोणता माणुसकीचा "रोलर" तयार करता येईल कि जो फिरवून  सर्व धर्मांची खडी... रंगाचां टार... भाषेचा डांबर...  एकरूप होऊन जाईल.... हिंसा, द्वेष, अंधश्रद्धा  यांचे खाच खळगे बुजून जातील.... आणि मोक्षाकडे जाण्याचा एक सुंदर... सरळ...सहज आणि सोपा मार्ग तयार होईल.....
 

Thursday, March 25, 2010

पैसा बोलता है!!!

खरं सांगू आज गप्पा मारायचा जाम मूड आहे माझा; पण तेव्हडा रिकामा वेळ आहे कोणाला?
मला स्वतःला काम करायची विशेष आवड नाही आणि आज तर मूड पण नाही बळजबरी काम करण्याचा.
आज निवांत बसून जुन्याच विषयांवर गप्पा माराव्यात म्हणते.
 खरं सांगा तुम्हाला तुमच्या जीवनातला कोणता काळ सगळ्यात रम्य वाटतो? मी सांगू? अर्थात बालपण... नाही का?
परीक्षेशिवाय कसलाही दडपण नाही. चिंता नाही. असली तरी जाणवायची नाही. आता वाटते तशी उगीच वाटणारी तगमग नाही.
 पण गेले ते दिवस आणि उरल्या त्या आठवणी...
 मला आता जॉब नाही आणि खरं तर मनापासून इच्छाही नाही.
 मला खर सांगू काय करायला आवडतं... निवांत गप्पा मारायला... फिरायला.... गाणी ऐकायला...कविता लिहायला.... वाचन करायला...
खरच फक्त या कामासाठी मला पैसे मिळाले असते तर.... असाही विचार बराच वेळा मनात येतो.... तुम्हाला नाही वाटत कधी असं?
पण आता या निवांतपणाचाही कंटाळा आलाय.
होतं काय आपण असतो निवांत पण सगळे नसतात त्यावेळी... आणि मग आपली उगीच चीड चीड होत राहते की आपल्याला कोणी वेळ देत नाही. आपल्याला कोणी समजून घेत नाही. समोरच्या व्यक्तीला वाटत असत की हि व्यक्ती काय रिकामीच आहे तिला काय माहिती  आपल्याला किती ताप आहेत ते...  म्हणून मग त्याची चीड चीड...  वैताग...
आता हे सगळं आपल्याला कळत असतं........ पण वळत नाही त्याचं काय........ 

मग या सगळ्या त्रासापासून मुक्ती मिळवायची तर आपण गुंतून राहणे.
गुंतवून घ्यायचे  अनेक मार्ग आहेत हो पण त्यासाठी परत लागतो तो पैसा.......
म्हणून मग काय तर शेवटी उपाय जॉब......
खरं कस ना आपल जीवन नेहमीच दुस-यावर अवलंबून असतं.
    असो आता माझी गरज आहे स्वतःला गुंतवून घेणं. आणि त्यासाठी आता इंटरविव्यूची तयारी करायचीय. करावीच लागेल कारण बाबानो..शेवटी........
पैसा बोलता है!!!